![]() |
| चं. प्र. देशपांडे |
आपुल्याच देठी
आपुलाच ताण
किती सोसू व्रण
काळेगोरे?
हळू जोपासल्या
आपुल्या बिंबाला
भोसकतो भाला
- प्रतिबिंब
व्हावे क्षणभर
देहाचे इंधन
मरणाचे धन
ओसंडावे...
........
सावल्या
सावल्या सरकल्या
सुटल्या फोफावल्या
वाढल्या दूरवर
टॉवरवरून नदीपल्याड
आकाशातून पसरत पसरत
पसरल्या अनंतभर
झाल्या अनंत
कुणीही अग्नी दिला नाही.
....
अटळ
कुठल्याच सुस्थिर पायावर
सुरक्षित राहू शकणार नव्हते आयुष्य
आणि संपूर्ण धोक्यात
अस्तित्वहीनच होणार होती
मी तयार केलेली सर्व मूल्ये...
सर्व व्यथांना थांबवून धरण्याच्या
माझ्या प्रयत्नात
हे सत्य एक सवय म्हणून
सामावू शकणार नव्हते...
अनुभव निरुपयोगी ठरणे अटळ होते...
....
समाज
सकाळी उठल्यावर चिमण्यांच्या आवाजाची
सवय असावी
तशी घराची ओढ
रक्तात मुरलेली...
सर्व सामाजिक गोष्टींतही
जपलेला वेगळा स्वर
सूक्ष्म आणि नाजूक...
घरातल्या समाजातही जेव्हा
पट्ट्या बदलताना दिसतो मला
एका सकाळी
तेव्हा अजानक सर्व चिमण्या
शांत झालेल्या...
माझा समाज
माझ्या रक्तातून उडून गेलेला...
....
हिंसेची गाणी
आता हिंसेची गाणीच आम्हाला
अधिकाधिक आवडत जातील.
अत्यंत तीव्र प्रतिक्रिया
जागा झालेल्या आम्हाला आवडतात.
यात आहोत
हे तेव्हा प्रकर्षाने कळते.
आता आम्हाला
आमच्या प्रत्यक्ष असण्यापेक्षा
आमच्या असण्याची खात्रीच अधिकाधिक
पक्की करत राहण्याची गरज आहे.
....
झाड
मी झाडाकडे उद्धटपणे पाहिले
तर त्याची पाने मरगळून गेली.
झाडातला न्यूनगंड पाहून
त्याच्यावरचे पक्षी उडून गेले.
हे झाड काही माझा सूड
घेऊ शकणार नाही. हे नक्की.
...
नियती
नियती म्हणजे काहींना काही
खरे धरून चालणा-या मनस्थितीला
हमखास धक्के देणारी शक्ती...
- चं. प्र. देशपांडे

' आपुल्याच ' खूप आवडली.
ReplyDelete