Monday, September 13, 2010

आरतीप्रभू यांच्या तीन कविता

आरतीप्रभू (चिं. त्र्यं. खानोलकर)
स्वगत

एका रिमझिम गावी
भरून आहे हृदयस्थ तान
पण
स्वगत विसरुन तिथे
जातां आले पाहिजे
चालून जाता येण्यासारखी
पायतळी आहे माती
पण
जाणे न जाणे तरी कुणाच्या हाती?
....

पूर

तुझे गात्र गात्र:
पावसाळी रात्र;
सारे. क्षेत्र ऐसें
झालें पूरपात्र

माझे दोन्ही डोळे:
गाव झोंपलेले;
मला नकळत
पुरांत बुडाले

हृदयाचें बेट:
कुठे त्याची वाट?
हातास लागावा
एक तरी काठ!
...

कविता

या माझ्या अजाण कवितेचा अपमान
का करता बाबांनो कां?
प्रेम हवंय का या कवितेचं?
मग ते मागून मिळणार आहे का तुम्हाला?
खूप काही द्यावं लागेल त्यासाठी.
काय काय द्याल?
आत्म्याची बाग फुलवता येईल तुम्हाला?
पण त्यासाठी तुम्हाला तुमचा आत्मा
तुमच्याच तळहातावर
एखाद्या स्वातीच्या थेंबासारखा घ्यावा लागेल,
पण त्यासाठी तुमचे हात तुम्हाला
चांदण्याहून पारदर्शक करावे लागतील.
कराल?

माझ्या कवितेपासून मीही, तिच्याजवळ असून,
दूर असतों.
भीत भीत स्पर्श करतो तेव्हा तिचे डोळे
पाणावल्यासारखे चमकतात.
डहुळून जातात त्यांतले रानचिमणे विभ्रम.
ती एका पोक्त कलेने प्रौढ होते.
या कवितेच्या मुलायम केसांवरून
सरकून जातात श्यामघनांतले मंद संधिप्रकाश.
वाटतं की ती आताच उभीच्या उभी
निसटून जाणार आहे
दोन आर्त स्वरांच्या मधल्याच रिकाम्या स्वर्गांत.
स्पर्श करतांना अजूनहि मी तेवढा शुद्ध नाही
एखाद्या बुद्धाच्या जिवणीवरील उदासीन हास्यासारखा

या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका
कारण ती ज्या वाटा चालते आहे
त्या आहेत तिच्या स्वत:च्या नागमोडी स्वभावांतून स्फुरलेल्या.
मोडून पडाल!
तिच्या नावाचा जप करायचा असेल तर
त्यासाठी तुम्हाला तुमच्या कण्याच्या मणक्यांचे
रुद्राक्षमणी ओवून
जपमाळ करावी लागेल
आणि श्वासनि:श्वासांचा करावा लागेल कमंडलू;
पसरावे लागेल संज्ञेचे व्याघ्रचर्म.
आहे तयारी?
ज्या आपल्या वाटा हुडकीत आल्या वाटेने;
तिला पाहायचे डोळे प्रथम मिळवा,
मगच पाहा तिच्याकडे डोके वर उचलून.
ती भोगतेय जे जे कांही त्यांतल्या तिळमात्रही वेदना
तुम्हाला सोसायच्या नाहीत.

मी स्वत: पाहातोंय स्वत:च्याच कवितेला
एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेवून.
- आरती प्रभू

(दिवेलागणमधून)

1 comment:

  1. pranav,khup avadalya kavita..poor kavitet kiti utkatpane arti prabhu bhidatat anubhavala,10 olin madhun purn anubhav jivant karane khaychi gosht nahi..shevatachi kavita tar pratyek kalavantache swagat bolate janu...atishay avadali..khup divasani tuzyamule parat arti prabhu vachanat aale ani prasanna karun gele

    ReplyDelete